मुख्य सामग्रीवर वगळा

प्राध्यापक भरतीची व्यथा

              

   डॉ.पाटील /लातूर' या नावाने  मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असलेल्या मित्राचा आज फोन आला होता.  तो सांगत होता, "सर, प्राध्यापक भरती MPSC द्वारे होण्यासाठी काय करावे सुचत नाही, संस्थाचालक 50 लाख रुपये मागतायेत जॉयनिंगसाठी, शेतही जास्त नाही विकून म्हडे शिकले असते त्यांचे.  नोकरी नाही म्हणून लग्नही जमेना. मायच्यान  सांगतो सर, 41 वर्षे वय आहे माझे,   शेकड्यांनी मुली पाहिल्या ; पण कुणी होकार दिला नाही. चार पोते तरी पोहे खाऊ घातले असतील आलेल्या पाहुण्यांना , आणि साड्यांचे तर विचारूच नका ; दुकानदार केस करायला निघाला होता उधारीसाठी, पण आईने मंगळसूत्र आणि घरातलं किडुकमिडुक विकून थोडी उधारी मिटवली, तव्हा गप्प बसला दुकानदार, पण देणं आहेच त्याचं. " मी सहज विचारले विषय कोणता आहे तुमचा आणि CHB का करत नाहीत मग एखाद्या कॉलेजवर? डॉ. सांगू लागले, "ऑक्सफर्ड शिकून आलेल्या प्राध्यापकाकडे अर्थशास्त्र पीच.डी.झाली माझी. आणि केली सर CHB 4-5 कॉलेजवर. सुरुवातीला काही ठिकाणी फुकट शिकवले आणि नंतर काही ठिकाणी पगारावर जॉईन झालो तर मिळायचे चार -सहा हजार तेही टायमाला नव्हते मिळत. एकदा तर रुमभाडे आणि मेसची थकबाकी दिली आणि जवळचे पैसेही संपले होते. अशातच सँडल तुटले आठ दिवस तारेने बांधून घातले, मग एका मंदिरासमोरून बदलून आणले. कित्येक दिवस अंतर्वस्त्रेही नवे घायला पैसे नसायचे, घालायचो तसेच , पण पोहण्याचा छंद असतानाही कधी मित्रांसोबत पोहायला गेलो नाही. मग कशाला करायची CHB, गरिबांचे काम नाही ते. दुसरं असं की, प्राध्यापक भरती MPSC ने घ्यावी यासाठी नेहमी fb वर लिहितो, मंत्र्यांना निवेदने देतो म्हणूनही कुणी घेत नाही. आता तर अनुदानित कॉलेजवर CHB ला 500रुपये तास मिळणार आहे, मग CHB साठीही मतदारसंघ, जात, धर्म, नाते,तगडी शिफारस हे फुलटाईमसाठी लागणारे भांडवल लागेल. कोण नाही ओळखणार मला, म्हणून तर प्राध्यापक भरती MPSC ने घ्यावी, नसता नोकरीही लागत नाही आणि लग्नही होत नाही. माझे काहीही झाले तरी चालेल पण , मला नोकरी लागावी यासाठी आई आठवड्यातून तीन तीन उपवास करते, कोणी दारावर भगव्या कपड्यात आले की 'माझ्या पोराला नोकरी लागल का ?त्याचं लगीन औंदा व्हईल का', असं विचारते तेंव्हा मेलेलं बरं असं वाटतं सर, निम्मं अंग नाही राहिलं तिचं. वाटलं होतं 2014 ला सत्तेवर आल्यावर हे सरकार MPSC द्वारे भरतीचं आश्वासन पाळील; पण कसलं काय.  वाटतं आय घातली आणि पीएचडी केली. हॉटेल कामगार, सेक्युरिटी बरे आपल्यापेक्षा दहा वीस हजार कमावतात, आणि आयटीआय केलेल्या मित्रांची तर घरेही झाली. आपण फक्त झेरॉक्स मारायच्या आणि द्यायच्या मुलाखती. ज्याच्याकडे 45-50 लाख असतील त्याचेच काम होणार, सर कित्येकदा मुलाखतीत नाव विचारून काढून देतात, नाटक असते सगळे. आपण गरीब  कोर्टातही जाऊ शकत नाही आणि पैसेही नाहीत, मग वडापाव खायचा आणि व्यवस्थेला शिव्या देत यायचे घरी. घरी आल्यावर आई-बापांचा तोच प्रश्न 'आता लागेल ना नोकरी, आमच्या डोळयांसमोर तुला नोकरी लागून तुझे लग्न झाले की सुखाने  डोळे मिटू एकदाचे.' जीव जळतो नुसता सर. वय झाल्याने स्पर्धा परीक्षेतही मन रमत नाही."  डॉ. पाटील यांचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले; पण हा प्रश्न केवळ त्यांचाच नाही, तर डीएड, बीएड, सेट/नेट,पीएच.डी. केलेल्या लाखो शेतकरीपुत्रांचा आहे. अनेक वर्षे पाऊसमान साथ देईना म्हणून शेतकरी बाप संकटात आणि मुलांनी अशी अवस्था झाली. 


       पाटलांच्या वर्तमानाविषयी जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी विचारले सर सध्या काय सुरू आहे, तर ते हसले आणि म्हणाले, " सर, मी  लातूरजवळच्या एका खेडयातील आहे. गावात राहायची लाज वाटते, म्हणून उमरगा तालुक्यातील मामाकडे आलोय. कधी मित्रांकडे तर बऱ्याचदा मामाकडे असतो.  त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. एखादा दिवस पाहुणचार झाला की जितके दिवस राहू तितके दिवस पंधरा वीस जनावरांचे शेण उचलतो आणि पडेल ते सर्व काम करतो. मग मामाही निघून जा म्हणत नाही; पण सुरुवातीला म्हणजे पीएच.डी. होऊन जास्त दिवस नव्हते झाले तेंव्हा. मी एकदा शेण नाही उचलत ,दुसरे काम सांगा म्हणालो होतो तर उपाशीपोटी निघून जावे लागले होते.  वैताग आलाय जगण्याचा.  म्हणून शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या मित्रांना फोन करून केंद्रीय पद्धतीने प्राध्यापक भरतीचे काय झाले विचारत असतो.  दररोजच्या माझ्या फोनने वैतागलेत बरेच मित्र, ते आता फोनही उचलत नाहीत म्हणून केला तुम्हाला कॉल. सोशल मीडियावरही नसतो हल्ली पहिला मोबाईल हरवल्यामुळे साधाच वापरतोय; जुना घेतलाय साडेतीनशे रुपयात.

    थोडे खर्चीपुरते पैसे मिळाले की जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करणार आहे 'एकतर MPSC द्वारे प्राध्यापक करा अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या'अशी मागणी करणार आहे.  " 

   मी म्हणालो, "पाटील सर असे खचून नका जाऊ, निघेल मार्ग यातूनही."  तर ते म्हणाले, "सर, अच्छे दिन पाहिले, सारं संपल्यात जमा आहे, आता 5 वर्षे नुसतं झुरवून मारील सरकार. बरं जाऊद्या आपणच शिकून आय घातली. बोलतो नंतर; मामा आलाय, धारा काढायच्या आधी शेण नाही उचलले तर द्यायचा काढून"  म्हणत  डॉ. पाटील सरांनी फोन ठेवला.                      

              पाच वर्षांपूर्वी आमच्या शेजारी मूळव्याधाच्या त्रासाने बेजार एक तावडे काकू राहत होत्या. त्यांच्या आजाराविषयी सर्वत्र चर्चा होती, टवाळखोर तर त्या दिसल्या की 'हात बदला काकू म्हणून' चिडवून  पळून जात असत. काल अचानक त्या खूपच  गुलमंडी वर भेटल्या , ठणठणीत होत्या. मी सहज विचारले ,"काकू बरा आहे आजार काय विलाज केला?" त्या म्हणाल्या , "दुःख वेशीवर टांगले की मार्ग सापडतो बाबा, एका, लग्नाला अमरावतीला गेलते एका म्हातारीने माझी हालचाल पाहून 'मूळव्याध झाले का बाई 'म्हणून विचारले आणि काही पथ्यं सांगून झाडपाला तिथे बांधायला दिला. पाचच दिवसात घोड्यावणी झाले बघ. " तावडे काकू चहा घेतो का विचारून निघून गेल्या, पण वेदना वेशीवर मांडल्यावर मार्ग निघतो, हे त्यांचे बोल आठवले म्हणून शिक्षण व्यवस्थेला जडलेल्या पण न दिसणाऱ्या मूलव्याधाविषयी थोडेसे वेशीवर बोललो....!!!

                                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी

मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी                    आजच्या घडीला शिक्षणाची डिग्री केवळ कागद ठरत असताना फक्त पारंपरिक शिकून उपयोग नाही. काळ बदलत आहे. एक काळ असाही होता की,   केवळ डी.एड./बी.एड. केले तरी सहज शिक्षक होता येत   असे आणि दहावी/बारावी पास झाले की, किमान मिलिटरीत / पोलिसात भरती होता येत असे. आज मात्र सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अगदी नेट/सेट/पीएच.डी. केली तरी नोकरी मिळत नाही. काही उच्च विद्याविभूषित तरुण वेठबिगारीची कामे करताना दिसून येतात, तर काही सीएचबीवर नोकरी करून पाच-सात हजारांत घर-संसार चालवण्याच्या फुटकळ प्रयत्न करताना दिसतात. डी.एड./बी.एड., नेट/सेट/पीएच.डी. करूनही आज नोकरी मिळविण्यासाठी पस्तीस ते पन्नास लाख रुपये डोनेशन भरावे लागते, हे काळे सत्य नाकारून चालणार नाही. एकीकडे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो   पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे छाती ठोकून सांगणारा आपला समाज शिक्षणामुळेच जीवनलढा हरतोय की काय, अशी शंका निर्माण होत आहे. साधी गोष्ट आहे साधा वडापाव विकणारा आपली मुले लाखभर डोनेश...

भाषा आणि वर्तमानातील व्यावसायिक संधी

           भाषा ही संवादाची एक प्रभावी साधन आहे , जी मानवी समाजाची अभिव्यक्ती आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे . भाषा फक्त संवाद करण्यासाठीच नाही , तर ती व्यक्तीच्या वैचारिक क्षमतेला धार देण्यासाठी आणि समाजातील विविध स्तरांशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असते . विशेषतः   आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात   भाषा केवळ सांस्कृतिक ओळख बनून राहिलेली नाही , तर ती एक व्यावसायिक संधीदेखील बनली आहे . आज   भाषा आणि व्यावसायिक संधी यांचे परस्पर संबंध वाढत चालले आहेत आणि अनेक नवीन क्षेत्रे उभी राहिली आहेत , ज्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत .         आजच्या वाणिज्यिक , शैक्षणिक   आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भाषा शिकण्याचे महत्त्व प्रचंड वाढले आहे . व्यवसाय , उद्योग   आणि सेवाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकापेक्षा अधिक   भाषांचे  ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे . जर एखाद्या व्यक्तीला बहुभाषिक कौशल्य असेल , तर त्याला जागतिक स्तरावर व्यावसायिक संधी मिळवणे खूप सोपे जाते ....