मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी
आजच्या घडीला शिक्षणाची डिग्री केवळ कागद ठरत असताना फक्त पारंपरिक शिकून उपयोग नाही. काळ बदलत आहे. एक काळ असाही होता की, केवळ डी.एड./बी.एड. केले तरी सहज शिक्षक होता येत असे आणि दहावी/बारावी पास झाले की, किमान मिलिटरीत / पोलिसात भरती होता येत असे. आज मात्र सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अगदी नेट/सेट/पीएच.डी. केली तरी नोकरी मिळत नाही. काही उच्च विद्याविभूषित तरुण वेठबिगारीची कामे करताना दिसून येतात, तर काही सीएचबीवर नोकरी करून पाच-सात हजारांत घर-संसार चालवण्याच्या फुटकळ प्रयत्न करताना दिसतात. डी.एड./बी.एड., नेट/सेट/पीएच.डी. करूनही आज नोकरी मिळविण्यासाठी पस्तीस ते पन्नास लाख रुपये डोनेशन भरावे लागते, हे काळे सत्य नाकारून चालणार नाही. एकीकडे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे छाती ठोकून सांगणारा आपला समाज शिक्षणामुळेच जीवनलढा हरतोय की काय, अशी शंका निर्माण होत आहे. साधी गोष्ट आहे साधा वडापाव विकणारा आपली मुले लाखभर डोनेशन देऊन चांगल्या शाळेत टाकतो. मात्र, चांगले शिकलेला डी.एड./बी.एड., नेट/सेट/पीएच.डी.धारक आपल्या मुलांना चांगल्या शाळेत टाकू शकत नाही. म्हणजेच तो स्वतःच्या कुटुंबालाही न्याय देऊ शकत नाही. तो तुटपुंज्या पगारावर राष्ट्र उभारणीत कसा काय योगदान देऊ शकेल ? वाईट अवस्था केवळ वरील शिक्षण घेतलेल्या तरुणांची नाही, तर नोकरीची अपेक्षा घेऊन शिक्षण घेतलेल्या प्रत्येक तरुणाची आहे. कोरोना काळापूर्वी आणि नंतरही महाराष्ट्रात जी काही तृतीय आणि चतुर्थ वेतनश्रेणीतील नोकरभरती झाली ती संपूर्ण वादग्रस्त ठरल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. याला ना पोलीस शिपाई भरती अपवाद होती ना आरोग्य सेवक. मग येथील शेतकरी आणि इतर सामान्य कुटुंबातील मुलांनी पोटापाण्याला लागायचे तरी कसे आणि कधी ? मुलाला/मुलीला नोकरी लागल्यानंतर घर बांधीन, तिचे/त्याचे लग्न जोरात करीन, वरच्या बांधापर्यंत पाइपलाइन करीन, असे स्वप्न पाहणाऱ्या पालकांच्या समोरच मुलांची लग्नाची वये निघून गेली, मुलांचे केसही पांढरे झाले मात्र नोकरी काही मिळत नाही. एकूणच पाल्य आणि पालक यांना निराशा सहन करायला लावणारा हा काळ असल्याचे वरकरणी भासत आहे.
नोकऱ्या नाहीत हे खरे आहे, मात्र या
बदलत्या काळाने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अर्धवेळ/पूर्णवेळ काम करून लाखो
रुपये कमावण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. आज आपणास कोणतीही माहिती हवी
असल्यास आपण गुगलवर शोधतो. यात एखादी भाजी कशी बनवायची, इंग्रजीतील एखादा जीआर
मराठीत शोधणे, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील माहिती, मोबाईल, टीव्ही बिघडला असेल तर त्याची कारणे व
उपाय शोधणे, पाऊसमान, शेळीपालन, कुकुटपालन, विदेशात नोकरीच्या संधी, विविध
आजारांवरील घरगुती उपाय, शेअर बाजाराची मराठी भाषेतील माहिती यासह लाखो
समस्यांसाठी आणि मनोरंजनासाठी आपण गुगल अथवा इतर सर्च इंजिनवर फेरफटका मारत असतो.
आपल्या प्रत्येक क्लिकला आपणास हवी असलेली माहिती कोणाचा तरी यूट्यूब चॅनल, ब्लॉग यावरून
मिळत असते. साधी ‘दुचाकी/चारचाकी कोणती घ्यावी’ अथवा ‘वजन कमी करण्यासाठी उपाय
कोणते?’ असे असे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे अनेक लेख
(आर्टिकल्स) आपणास ऑनलाईन आढळतात. कधीतरीच ते आपल्या भाषेत असतात, बऱ्याचदा ते
हिंदी अथवा इंग्रजी भाषेत पाहायला मिळतात, अशावेळी मात्र मराठी माणसाची गोची
होताना दिसते, तरीही आपण ती माहिती जमेल तशी वाचतो. तुम्हाला हेही माहीत असेल यूट्यूब
चॅनल, ब्लॉग, वेबपोर्टल ही ज्ञानदानासोबतच ती आर्थिक उत्पन्नाची देखील साधने आहेत.
जगभरात असे खूप यूट्यूबर आणि ब्लॉगर आहेत की, ज्यांचे मासिक उत्पन्न दहा
लाखांपेक्षा अधिक आहे. काहींचे तर वार्षिक करोडो रुपयांत उत्पन्न आहे. यासोबत फेसबुक, ट्यूटर,
वेबपोर्टल हीदेखील अर्थार्जनाची साधने आहेत. मराठी माणसाला वरील सर्व माध्यमांतून
खूप मोठा पैसा मिळवता येईल. मात्र, आपल्याकडे लेखन कौशल्य असायला हवे. तुमच्याकडील
असलेली कोणतीही माहिती तुम्ही योग्य पद्धतीने मांडणी करून वरील माध्यमांवर सक्रिय
झालात तर काही महिन्यांत तुमचे चॅनल मॉनिटाइज होऊन तुम्ही हजारो रुपये कमावणे सुरू
करू शकता. हे सर्व तुम्ही तुमचे सध्या चालू असलेले काम करूनही करू शकता. या
माध्यमातून श्रीमंत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी कोणतीही इंग्रजीतील माहिती
तुम्ही मराठीत तुमच्या ब्लॉगवर टाकून हे काम सुरू करता येईल. उदा. दुचाकी/चारची
परवाना कसा मिळवतात/दुचाकी चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी घेतल्या जात असलेल्या
परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न कसे असतात. रहिवासी दाखला कसा काढावा याची
माहिती जरी तुम्ही तुमच्या ब्लॉगवर मराठीत
दिली तरी तुमच्या ब्लॉगला दरदिवस भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असेल.
वरील सर्व साधनांसह केवळ मराठी
प्रभावीपणे लिहिता येते, संपादन कौशल्ये अवगत आहे म्हणून तुम्हास कोणतेही दैनिक,
साप्ताहिक, मासिक अथवा प्रकाशन संस्था मुद्रितशोधक पदावर कामावर घेऊ शकते, तसेच
तुम्ही चांगले स्क्रिप्ट रायटर होऊ शकता, तुम्ही पत्रकार असाल अथवा होणार असाल तर
तुम्हास चांगल्या पद्धतीने बातमी लेखन करता यावे व तुमच्यातील सुप्त गुणांना वाव
मिळून तुमच्यातील लेखक/संपादक जागा व्हावा यासाठी ‘मराठी लेखन कौशल्ये आणि
मुद्रितशोधन’ हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. जो कोणीही विद्यार्थी, गृहिणी,
सुशिक्षित बेरोजगार, नोकरदार, रिटायर पर्सन
ऑनलाईन करू शकतो. चाळीस तासिकांचा हा कोर्स
महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबादेत एमजीएम विद्यापीठाच्या मराठी विभागात सुरू करण्यात आला आहे. त्यासोबतच मराठी भाषिकांनी
इतर काही भाषा अवगत केल्यास अनुवाद क्षेत्रात कार्य करण्याची मोठी संधी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा