प्रा. दिलीप महालिंगे नावाचा पाऊस
मराठवाड्यातील वर्तमान शिक्षण पद्धत पाहिली असता अशी अनेक कला महाविद्यालये आहेत, जिथे तीन वर्षांची पदवी पूर्ण झाली तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांची ओळख होत नाही. लाखो रुपये डोनेशन देऊन विकत घेतलेली नोकरी करताना असे नेहमीच घडते. बदलत्या काळासोबत कला शाखेपासूनच्या आशा-अपेक्षा संपत असल्याने सर्वत्रच शिक्षणाची उपेक्षा होताना दिसत आहे. महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत दोन वेळा थम करणे आणि नोकरी मिळवण्यासाठी भरलेल्या रकमेची वसुली कोणत्या मार्गाने होईल, याचाच पाठपुरावा करताना अनेक प्राध्यापक मित्र दिसून येतात. याचाच परिणाम म्हणून जसे एखादे दैनिक उघडले की, ‘अपघात’, ‘पतीकडून पैशासाठी छळ’, ‘दुकानात जाते म्हणून गेली अन परत आलीच नाही’ अशा बातम्या वाचायायला मिळतात. त्यासोबत ‘थेसिस सबमिशनसाठी ५० हजारांची मागणी’, ‘पीएच.डी. व्हायवासाठी मागितले दीड लाख’, ‘विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी’ यासारख्याही बातम्या नेहमीची येत असतात. अशा काळात एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना जर हजारापेक्षा जास्त माजी विद्यार्थी एका हाकेत एकत्र येऊन दोन-दोन भव्य सोहळे घेत असतील तर माझ्यासारख्या प्राध्यापकाला आपण कुठे आहोत ? आपण नोकरीच्या नावाने पाट्या तर टाकत नाही ? स्वतःला प्राध्यापक म्हणून घेण्यास खरच आपण पात्र आहोत का? असे शेकडो प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.
प्रसंग होता शनिवार, २५ फेब्रुवारीचा. वेळ सायंकाळी सात वाजेची, तापडिया रंगमंदिर हौउसफुल आणि बाहेरही तितकीच गर्दी. आपल्या जीवनाचे सोने करणाऱ्या गुरुंचा ऋणानुबंध सोहळा सुरू होता. छत्रपती साम्भाजीनगरीतील विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक दिलीप महालिंगे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त हा जमाव मोठा बोलका होता. कार्यालयीन कामकाज संपवून मीही पत्नी जया आणि चारवर्षीय कन्या शिवराज्ञीसोबत या सोहळ्याचा भाग म्हणून तिथे पोहचलो होतो. तसा मी महालिंगे सरांचा विद्यार्थी नाही. मात्र २०१३ साली विवेकानंद महाविद्यालयात पदव्युत्तर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झालो होतो. त्यावेळी मी नुकताच दैनिक दिव्य मराठी पेपर सोडला होता. मला या महाविद्याल्याविषयी फारसे काही माहिती नव्हते. तुम्ही म्हणाल पत्रकार माणसाला कसे माहिती नव्हते. पण मी जाणीवपूर्वक आणि ठामपणे सांगू इच्छितो की, सेट/नेट/पीएच.डी.धारक एखादी पूर्णवेळ नोकरीची जाहिरात आली तरच संस्थाचालक कोण? त्याची जात कोणती? त्याचा राजकीय पक्ष कोणता ? या प्रश्नांची उत्तरे शोधतो. फिक्स पे अथवा सीएचबीवर नोकरी करण्यासाठी आपण सांगकामे आहोत, एवढी पात्रता पुरेशी असते. महाविद्यालयाचे ‘‘विवेकानंद कला, सरदार ‘दलीपसिंग’ वाणिज्य व विज्ञान’’ हे नाव आणि आमचे विभागप्रमुख प्रा. दिलीप महालिंगे यांचा पेहराचा भाग असलेली डोक्यावरील पगडी पाहून मी मनोमन हा संस्थेचा मालक असावा अथवा यांच्या जागेवर तरी हे महाविद्यालय असा कयास बांधून मी सर समोरून दिसले की कट मारत असे. आठवडाभर असे चालले, मग सरांशी विभागातच एकदा भेट झाली आणि त्यांनी माझी मोठ्या आपुलकीने चौकशी केली. एक नोकरी सोडून आपण येथे आलो आहोत. जीवनात प्रथमच अध्यापन करत आहोत, जमेल की नाही, ह्या सर्व शंका सरांच्या एका भेटीतूनच विरल्या होत्या.
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथून १९८५ साली दिलीप महालिंगे महावियालायाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यूथ फेस्टीव्हलच्या स्पर्थेची तयारी करण्यासाठी आले होते. त्यासाठी त्यांना किमान १५ दिवस येथे मुक्काम करणे गरजेचे होते. उदगीर येथे शिक्षण घेत असताना उत्कृष्ट कलाकार म्हणून गौरविलेले महालिंगे मोठ्या आशेने औरंगाबादेत आले होते. घरची अत्यंत गरिबी असल्याने सोबत आणलेले साठ सत्तर रुपये पहिल्या दोन दिवसांतच संपून गेले होते. येथे ओळखीचे कोणीही नव्हते. अभिनयाचे धडे तर गिरवणे सुरू होते. मात्र, चार दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नव्हता. पाणी पिऊन कशीबशी गुजराण सुरू होती. तालमीदरम्यान त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुकही होत होते. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर याचे एकही चिन्ह दिसत नव्हते. रुममध्ये सोबत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या लक्षात ही बाब आली. त्याने चौकशी केली असता सरांनी त्याला आपबिती सांगितली. मग त्याने सरांना जेऊ घातले आणि पुढील काळात सरांची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली.
ज्या स्पर्घेची तयारी करण्यासाठी ते येथे आले होते, त्या स्पर्धेसोबतच सारणी झोनल आणि पुढे महराष्ट्राच्या इतिहासात सरांची मुख्य भूमिका असलेल्या थिएटर (मूकाभिनय, प्रहसन, एकांकिका)ने १८८६ ला नॅशनल चान्म्पियनशिप मिळाली. देशभरातील सर्व भाषांतील दैनिकांनी या सुवर्ण क्षणांना मोठी जागा दिली. सरांचे विविध ठिकाणी मोठमोठे सत्कारही झाले. सरांनी हे यश केवळ दोन वर्षात मिळवले होते. याचमुळे सरांची निवड देशातील अभिनयासाठी प्रतिष्ठित एनएसडी संस्थेत निवड झाली. पुन्हा तेथील २ लाखापेक्षा जास्त असलेली फीस कशी भरायची हा प्रश्न सतावू लागला. याच काळात विवेकानंद महाविद्यालयाची प्राध्यापक भरतीची जाहिरात आल्याचे मित्रांनी सांगितले. सरांची तेथे निवडही झाली. दोन–चार वर्षे नोकरी करू आणि पैसे जमा झाले की, एनएसडी जॉईन करायची, असे मनोमन ठरवून सरांनी विवेकानंद महाविद्यालय जॉईन केले आणि आणि कर्तव्यपरायणतेत एनएसडीला जायचे कायमसाठीच विसरून गेले.
विवेकानंद महाविद्यालयात येणारा विद्यार्थी अत्यंत गरीबीतील आणि समाजातील सर्व वर्गातील होता. अशा विद्यार्थ्यांना घेऊन सरांनी विद्यापीठाच्या यूथ फेस्टीव्हलमध्ये सलग २३ वर्षे जनरल चाम्पियनशिप मिळवून इतिहास रचला. तो आजतागायत अबाधित आहे. सरांनी त्यांच्या थिएटरचा विषय कायमच सामाजिक समस्या ठेवला. त्यात शेतकऱ्यांपुढील समस्या, तत्कालीन रॉकेल टंचाई व बेरोजगारीप्रमाणेच अफगाणिस्तानमधील आणीबाणीच्या काळातील वाताहत हे विषय सरांनी मोठ्या सामर्थ्याने हाताळले. विशेष म्हणजे तृतीयपंथीयांच्या समस्येवर देभारातील पहिली एकांकिका सरांनीच सादर केली. ही एकांकिका अचूक व्हावी यासाठी त्यांनी त्याकाळात त्यांना केवळ चार हजार पगार असताना तृतीय पंथीयांचे भावविश्व समजावे यासाठी एका तृतीय पंथीयाच्या एक महिना सोबत फिरण्याचे प्रतिदिन १०० रुपये मोजले. मात्र, त्या एकांकीकेमुळे तृतीय पंथीयांच्या समस्यांवर देशभर चर्चा घडवून आली. यातच त्यांचे यश दिसून येते. सर जसे हजारो विद्यार्थ्यांना आपले पालक वाटतात. तसेच त्यांच्या मित्रावार्गात देखील त्यांचे वरचे स्थान आहे. आज असे अनेक मान्यवर प्राध्यापक, साहित्यिक आहेत ज्यांना सरांनी आपल्या पगारातील अर्धीअधिक रक्कम दिली. आपले घर घेण्याचे स्वप्न मागे राहू दिले मात्र मित्रांच्या शिक्षणत खंड पडू दिला नाही. सरांचे अनेक विद्यार्थी आज नाटक, मालिका, चित्रपटात काम करताना दिसून येतात. कविवर्य नारयण पुरी असोत की अविनाश भारती हे सर्व सरांच्याच तालमीत घडलेले आहेत. त्यासोबत सर्वच विद्यार्थी सरांनी दिलेली मानवतेची शिकवण अंगीकारून आहेत.
प्रा. दिलीप महालिंगे सर २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत असल्यामुळेच शनिवारी शहरात ‘ऋनानुबंध’ सोहळा पार पडला. हा कार्यक्रम २३ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. सरांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी त्या काळात गाजवलेल्या थीएटरचे सादरीकरण केले. यात प्रहसन, एकांकिका, लावणी, गोंधळ यांचा समावेश होता. २३ वर्षांपूर्वीचे विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय, राजकारण आदी क्षेत्रात कार्यरत आहे. यात मुली आणि मुलांचीही संख्या मोठी आहे. माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले आणि बीड, उस्मानाबाद, चिखलीबरोबरच अनेक शहरातून दररोज ये-जा करत वरील कलांची तालीम आठ दिवस केली. आज अनेकजण पन्नाशीत असले तरी त्यांच्या अभिनयातून त्यांचा उत्साह तापडिया रंगमंदिराने अनुभवला. सोबतच सभागृहातील प्रत्येकजण सरांचे कौतुक ऐकून आणि पाहून भारावून गेला होता. मीही त्याला अपवाद कसा असेल. मी अंतर्मुख झालो आणि खूप दिवसांनी लिहिता झालो. वाटले प्रा. दिलीप महालिंगे सर म्हणजे एक पाऊस आहे, जो याच्या संपर्कात आला, तो तो रुजला, फुलाला आणि फळालाही लागला. अशा या निस्वार्थी पावसापुढे नतमस्तक होताना हा पाऊस ओळखीचा असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. बुधवार, १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तापडिया रंगमंदिरात ‘जागर माणूसपणाचा’ हा मानवंदनेचा कार्यक्रम घेत आहेत. चार दिवसांतच हा दुसरा भव्य कार्यक्रम होत आहे, यातच या आभाळमाया देण्याऱ्या माणसाचे मोठेपण सामावलेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा